मार्गदर्शक मंत्र
बृहदारण्यक उपनिषदातील (१.३.२८) हा शांती मंत्र पवमान मंत्र म्हणूनही ओळखला जातो. सर्व मानवजातीच्या कल्याणासाठीची ही प्रार्थना बृहदारण्यक उपनिषदात इतक्या थोडक्यात आणि सुंदरपणे व्यक्त केली आहे. या छोट्या प्रार्थनेत मानवी हृदयाच्या सर्व आकांक्षा समाविष्ट केल्या आहेत. आपल्या सर्वांना अंधारातून प्रकाशाकडे, असत्याकडून सत्याकडे आणि मृत्यूकडून अमरत्वाकडे म्हणजेच मोक्षाकडे जायचे आहे. सर्व आसक्ती आणि आज्ञानाच्या पूर्ण समाप्तीसाठी, जन्म-मृत्यूच्या बंधनापासून सुटकेसाठी ही प्रार्थना आहे. वासना, क्रोध इत्यादि आसुरी वृत्तींपासून मुक्त झाल्याशिवाय आत्मज्ञान अथवा अमरत्व प्राप्त होऊ शकत नाही. जोपर्यंत विचार, वाणी आणि कृती यांमध्ये शुद्धता प्रस्थापित करून मनुष्य अविद्येच्या पलीकडे जात नाही, तोपर्यंत व्यक्ती अमरत्व प्राप्त करण्याची आशा करू शकत नाही. शांतीमंत्रांमध्ये आपण तीन वेळा शांती जप करतो. याठिकाणी शांतीचे तीन प्रकार नसून शांती एकच आहे, परंतु ही शांती तीन प्रकारच्या समस्यांमुळे नाकारली जाते. या समस्या म्हणजे अधिदैविक, अधिभौतिक आणि अध्यात्मिक. समस्यांचा पहिला संच अशा स्त्रोतांकडून येतो ज्यावर आपले कोणतेही नियंत्रण नसते जशा की नैसर्गिक आपत्ती. अशांतीचा दुसरा स्त्रोत म्हणजे आपल्या सभोतालच्या जगातील समस्या ज्यांमध्ये राजकीय, सामाजिक किंवा घरगुती यांपैकी कोणत्याही प्रकारच्या समस्या अंतर्भूत आहेत. शांतीसमोरील तिसरा अडथळा म्हणजे आत्मकेंद्रित असलेल्या समस्या म्हणजेच स्वतःशी संबंधित समस्या ज्यामध्ये विविध शारीरिक विकार तसेच मानसिक समस्या यांचा समावेश होतो. शांतीमंत्रांचा जप करताना आपण या तीन संभाव्य अडथळ्यांपासून मुक्तीसाठी प्रार्थना करतो.
तैत्तिरीय उपनिषदामधील (२.१) हा शांती मंत्र. ज्ञान मिळवण्यासाठी आवश्यक पात्रतेची प्रार्थना करणाऱ्या या मंत्राचा अर्थ असं की, 'परमात्मा आम्हां दोघांचे (शिष्य आणि आचार्य) एकाच वेळी रक्षण करो, आम्हां दोघांकडून एकाच वेळी भोग घेववो. आम्हां दोघांकडून एकत्र सामर्थ्य संपादित होवो, आम्हां दोघांचे अध्ययन तेजस्वी असो, आम्हां दोघांकडून परस्परांचा द्वेष न होवो. अधिदैविक, अधिभौतिक आणि अध्यात्मिक अशा तीन प्रकारच्या समस्यांपासून सर्वांना शांती लाभो'. ज्ञान मिळवण्यासाठी जे काही आवश्यक आहे, त्यासाठी आपण सतत प्रयत्न करायला हवेत. विद्यार्थ्याची ज्ञान मिळवण्याची क्षमता श्रद्धा, बांधिलकी, पार्श्वभूमीचे ज्ञान, धारणा आणि स्मरणशक्ती यांचावर अवलंबून असते. आचार्यालाही बांधिलकी, आरोग्य, वेळ आदींची गरज असते. शिष्य आणि आचार्य या दोघांनाही संबंधित आवश्यक पात्रता मिळू दे अशी प्रार्थना येथे केली आहे. ज्ञान मिळवताना एकाने संवाद साधला आणि दुसऱ्याने मिळवला याप्रमाणे ज्ञान हे केवळ शब्दांपुरते मर्यादित राहू नये, ते तेजस्वी, अर्थपूर्ण असावे अशी प्रार्थना येथे केली आहे. शास्त्र हा निष्कर्ष काढण्याचा विषय नाही, तो अगदी स्पष्टपणे समजून घेतला पाहिजे. म्हणून, जे अभ्यासले आहे ते चमकदारपणे स्पष्ट, कोणत्याही अस्पष्टतेपासून मुक्त, कमीत कमी त्रुटी असलेले असावे याचा प्रयत्न नेहमी केला पाहिजे. द्वेष म्हणजे कोणत्याही प्रकारची अनिच्छा किंवा गैरसमज. द्वेषाच्या अधीन होऊन त्यामूळे ज्ञान मिळवताना कोणतेही अडथळे येणार नाहीत याचा प्रयत्न गुरु-शिष्यांनी सदैव केला पाहिजे, जेणेकरून त्यांच्यातील संवाद योग्य प्रकारे पूर्ण होऊन त्यांचे अध्ययन तेजस्वी होईल.
अमृतबिन्दु उपनिषदातील (१८) हा मंत्र. हा मंत्र शास्त्रग्रंथांसंबंधी असला तरी त्यात कोणतेही पुस्तक कसे वापरावे याविषयी उपदेश केला आहे. या मंत्राचा अर्थ असा की, 'ग्रंथांचा अभ्यास केल्यावर, ज्ञान व विज्ञान प्राप्त करण्यास उत्सुक, आतुर असणाऱ्या बुद्धिमान विद्यार्थ्याने (त्यातून ज्ञान आणि विज्ञान इतर विषयांपासून वेगळे करून ते ग्रहण केल्यानंतर) ग्रंथांचा पूर्णपणे त्याग करावा, ज्याप्रमाणे धान्याची इच्छा असणारा (शेतकरी मळणी, उफणणी करताना धान्य घेऊन) फोलकटाचा (कोंड्याचा) त्याग करतो'. आपल्याला नेहमी सांगितले जाते की आपण गुरुंचा आणि ग्रंथांचा नेहमी आदर केला पाहिजे, या उलट या मंत्रात असे सांगितले आहे की धान्याच्या कोंड्याचा किंवा फोलकटाचा जसा त्याग केला जातो तसा ग्रंथांचाही त्याग करावा. हा सरळ सरळ विरोधाभास वाटतो. परंतु ज्यावेळी आपण साधन आणि साध्य यातील फरक नीट जाणत नाही त्यावेळी हा गोंधळ उत्पन्न होतो. ग्रंथ म्हणजे ज्ञान मिळवण्याची साधने आहेत. एकदा उद्दिष्ट साध्य झाल्यावर साधनांची उपयुक्तता संपल्याने त्यांची आवश्यकता उरत नाही, त्याचप्रमाणे नीर-क्षीर विवेकाने एखाद्या ग्रंथातील ज्ञान ग्रहण केले तर त्यानंतर त्या ग्रंथाची आवश्यकता उरत नाही. स्वामी विवेकानंदांना एकदा विचारले गेले की, 'वेदात एवढे श्रेष्ठ काय आहे? (वेदांचे इतके महत्त्व का आहे?)' ते म्हणाले, 'वेद म्हणतात- वेदांचा अभ्यास करा आणि सत्यतत्त्वाला जाणून घ्या. नंतर वेदांचा त्याग करा.' ब्रह्म जाणून घेताना वेदही लोप पावतात आणि ब्रह्म (सत्यतत्त्व) तेवढे उरते' (यत्र वेदो अवेदो भवति। - बृहदारण्यक उपनिषद)
हा शांती मंत्र अनेक प्राचीन शास्त्रांमध्ये थोड्याफार फरकाने परंतु समान अर्थ राखून आढळतो, वरील मंत्रातील शेवटच्या तीन ओळी गरुड पुराणातील (२.३५.५१) आहेत. विश्वकल्याणाची प्रार्थना करणाऱ्या या मंत्राचा अर्थ असा आहे की, 'सर्व सुखी होवोत, सर्व रोगमुक्त होवोत, सर्व मंगलमय घटनांचे साक्षीदार होवोत आणि कुणाच्याच वाट्याला कसलंही दुःख येऊ नये. अधिदैविक, अधिभौतिक आणि अध्यात्मिक अशा तीन प्रकारच्या समस्यांपासून सर्वांना शांती लाभो'. याप्रकरची निःस्वार्थ भावना सदैव ठेवणाऱ्या व्यक्तीचे मन शुद्ध राहण्यास मदत होते आणि शुद्ध मनापासून शुद्ध भविष्य निर्माण होण्यास मदत होते.