बांबू वनशेती
सारांश: पावसावर अवलंबून असलेल्या जमिनीवरील हंगामी पिकांना वनशेतीचीही जोड देता येईल. अशा वनशेतीत बांबू लागवड अंतर्भूत करता येईल. ठाणे जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील अनेक आदिवासी शेतकऱ्यांनी आपल्या भातशेतीच्या बांधावर तसेच वर्कस जमिनीवर बांबूची लागवड यशस्वी केली असून त्याद्वारे त्यांना नियमित रोख उत्पन्न मिळत अहे. ह्या तालुक्यात चिकू, आंबे, लिची, पपनस ह्या फळझाडांचे मोठे मोठे बगीचे असून फळे बाजारात पाठविण्यासाठी बांबूचे करंडे फार मोठ्या प्रमाणात लागतात. हे करंडे बनविण्याचे काम शेकडो भूमिहीन स्त्रिया करीत असतात. हे करंडे बनविण्यासाठी लागणारा बांबू सध्या बाहेरून आणावा लागतो. ह्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी जर बांबू लागवड मोठ्या प्रमाणात केली तर त्याद्वारे त्यांना रोख उत्पन्न तर मिळेलच परंतु त्याचबरोबर शेकडो भूमिहीन स्त्रियांना रोजगार प्राप्त होईल. महाराष्ट्रात फळझाडांच्या लागवडीचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. साहजिकच भविष्यात फळांचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात होणार आहे. ही फळे बाजारात विक्रीसाठी पाठविताना बांबूपासून बनविलेले करंडे मोठ्या प्रमाणात लागणार आहेत त्या दृष्टीने आपण बांबू लागवडीला प्रारंभ केला पाहिजे. महाराष्ट्रातील पश्चिम घाट व सातपुडा पर्वताच्या उतारावर जी शेती केली जाते त्या जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होत असते. ही धूप थांबविण्यासाठी मृदसंधारणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. ह्या कार्यक्रमाला वनशेतीची जोड दिल्यास जमिनीची धूप थांबवण्यास मोठीच मदत होईल. अशा वनशेतीत बांबू पिकांचा अंतर्भाव करता येईल. जमिनीची धूप ही आपल्या समोरील मोठीच समस्या आहे. ही समस्या दूर करण्यासही बांबू वनशेती उपयोगी होईल. आपल्या जमिनीत सेंद्रिय खतांचा अभाव अहे. सेंद्रिय खतामुळे जमिनीची जलधारणशक्ती वाढते. पिकांना लागणारे अन्नांश उपलब्ध होतात व गांडूळासारखे उपयुक्त जीवजंतू वाढतात. ह्यासाठी जमिनीला नियमितमपणे सेंद्रिय खतांचा पुरवठा करणे आवश्यक आहे. परंतु आज सेंद्रिय खते पुरेशा प्रमाणात उपलब्ध होऊ शकत नाहीत. बांबूची लागवड केल्यास त्यापासून वाळलेली पाने मोठ्या प्रमाणात मिळू शकतात व त्याद्वरे उत्तम कंपोस्ट खत बनविता येते. अशा रीतीने बांबू लागवडीद्वरे आपणास सेंद्रिय खताचीही निर्मिती करून आपल्या जमिनीची उत्पादकता वाढविता येईल.
लेखक: श्रीकांत थत्ते
संदर्भ क्रमांक: ४०७७
