महर्षी वाल्मिकी
सारांश: महर्षी वाल्मीकींच्या जीवनाबद्दल अधिकृत माहिती कोठेही उपलब्ध नाही. त्यांच्याविषयी अनेक दंतकथा प्रचलित आहेत. त्यांची भारतात विविध ठिकाणी मंदिरे आहेत, अनेक आख्यायिका आहेत. मात्र त्यांच्या मोठेपणाविषयी कोणालाही शंका असण्याचे कारण नाही. ते सर्वाना सर्वकाळ वंदनीयच आहेत. कोळी, आदिवासी, भिल्ल इथपासून ते सुमति नावाच्या ब्राह्मणाचा पुत्र म्हणून असल्याच्या विविध आख्यायिका त्यांच्याबद्दल प्रसृत आहेत. पण रामायणाच्या उत्तरकांडात स्वतः वाल्मिकी म्हणतात,
प्रचेतसोहं दशमः पुत्रो राघव नंदन।
मनसा कर्मणा वाचा भूतपूर्वं न किल्विषम॥
ते म्हणतात, 'हे श्रीरामा, मी प्रचेतसाचा दहावा पुत्र असून मी आपल्या जीवनात कधीही पापाचरण केले नाही. प्रचेता म्हणजे वरुण. त्याला भृगु आणि वाल्मिकी असे दोन पुत्र होते. वाल्मिकी हे शंकरभक्त असल्याचे मानले जाते. वाल्मिकींचा जन्म अश्विन महिन्यातील शरद पौर्णिमेचा अर्थातच कोजागिरी पौर्णिमेचा असल्याचे मानले जाते. महर्षी वाल्मिकी हे श्रीरामाचे समकालीन होते. आपल्या तपश्चर्येनंतर झालेल्या ज्ञानप्राप्तीनंतरच नारद आणि ब्रह्मदेव यांच्या आशीर्वाद प्राप्त करून त्यांनी रामायणाची रचना केली. श्रीरामांच्या जीवनातील सर्व प्रसंगांचे त्यांना यथार्थ ज्ञान होते. त्यामुळे वाल्मिकी रामायण हे त्या काळातील घटनांचा अधिकृत ऐतिहासिक दस्तऐवज समजायला हरकत नाही.
लेखक: विश्वास देशपांडे
संदर्भ क्रमांक: ११५५
.jpg)