पंचदेव उपासना श्री दत्त उपासना
सारांश: प्रस्तुत पुस्तकात श्रीदत्त दिगंबर महात्म्य वर्णिले आहे, जो भारतीय दैवत - शास्त्रातील प्रमुख देवता आहे. श्रीदत्त दिगंबरांच्या नावाचे पुराणही निर्माण झाले आहे. या पुराणातून श्रीदत्त दिगंबरांच्या उपासनेची विधिविधाने कोणती, तेही सांगितले आहे. त्याच्या आधारावर मी श्रीदत्त दिगंबरांची उपासना विशद केली आहे. उपासनेचे रहस्य- एखाद्या देवाची पूजा करणे म्हणजे त्याची उपासना करणे, असे सामान्य जनांना वाटते. पण ते पूर्णपणे खरे नव्हे. पूजा हे उपासनेचे फक्त एक अंग आहे. पूजा, ध्यान, चिंतन, उपवास, पारणा, कथाश्रवण, व्रत, उपायन, दक्षिणा, ब्राह्मणभोजन, मंत्रजप, पुरश्चरण, स्तोत्र, प्रार्थना, विधि-निषेध एवढे सगळे मिळून उपासना बनते. उपास्याची मानसपूजा हाही उपासनेचाच एक प्रकार होय. आपण सर्वांआधी उपासनेचे रहस्य काय, ते नेमके समजून घेतले पाहिजे. उप + आस मिळून उपासना शब्द बनतो. त्याचा अर्थ उपास्याच्या जवळ पोचणे, मनाने त्याच्या जवळ राहणे असा आहे. उपासक तसा उपास्याजवळ पोचला, की मग इष्ट देवतेच्या कृपाप्रसादाने त्याला कृतार्थता लाभते. उपासना फलप्रद होण्यासाठी उपासकाच्या अंतरात भक्तीचा उदय व्हावा लागतो. भक्तीने उपासनेतला शुष्कपणा जाऊन तिला आर्द्रता येते. तिचे प्रत्येक अंग भावस्निग्ध होते. भक्ती हा उपासनेचा प्राणच आहे.
प्रकाशक: प्रोफीशिएंट पब्लिशिंग हाउस
संदर्भ क्रमांक: ११४१
