वारकरी भजन संग्रह
सारांश: या भजनसंग्रहांत वारकरी संतांच्या अमर वाणींतून जे अभंग निघाले त्यांपैकी नित्य पाठांतील एकूण जे अभंग आहेत, ते निवडून घेतले आहेत. श्रीज्ञानेश्वरमहाराजादी संत म्हणजे परमेश्वरानें प्रसन्न होऊन महाराष्ट्रास दिलेली एक अमूल्य अशा नवरत्नांची देणगी आहे. या संतांनी देव आपलासा करून घेतला; इतकेंच नव्हे तर देवाच्या भेटींत त्यांना जें महासुख प्राप्त झालें तें इतर लोकांनाहि चाखावयास मिळावें म्हणून त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. ' सेवितो हा रस वाटितो आणिकां ' असे म्हणत ते घराबाहेर पडले. लोकांच्या घरी जाऊन देव घ्या कोणी देव घ्या कोणी ' असे म्हणत त्यांनी त्यांना बोलाविलें ; पण ते त्यांना झोंपलेले आढळून आले. तेव्हा त्यांना 'आतां उघडी डोळे 'म्हणून हाक मारून जागे केलें. असें करीत असतांना त्यांना प्रापंचिक लोकांच्या शिव्याहि खाव्या लागल्या; पण या संतांचें हृदय म्हणजे माउलीचे हृदय होते. त्यांनी ते कार्य आपल्या हयातीत कीर्तन-प्रवचनद्वारा केलेच; पण आपला नश्वर देह पडल्यानंतरहि मागून येणाऱ्या पांथिकांना उपयोगी पडावे म्हणून आपल्या उपदेशाची ग्रंथरूपाने रचना केली. दयानिधि संतांनी अशा रीतीने जो परमात्मप्राप्तीचा मार्ग दाखवून दिला त्या मार्गानें चालत जाऊन सहस्रावधि जीवांनीं आपल्या आयुष्याचे सार्थक करून घेतले आहे. तो उपदेशाचा मार्ग पूर्वीसारखाच आजहि स्वच्छ राहिला आहे; कोठेहि मलीन अथवा पुसट झालेला नाही. म्हणूनच त्या उपदेशास अभंग म्हणतात.
संपादक: ह भ प शं वा दांडेकर
संदर्भ क्रमांक: ११६०
