श्रीकृष्ण चरित्र
सारांश: युद्धाच्या आरंभी अर्जुनाला गीता सांगणारा तो श्रीकृष्ण अशीच जनमानसात श्रीकृष्णाची प्रतिमा आहे. गीतेचे तत्त्वज्ञान सांगणारा आणि अर्जुनाचा सारथी झालेला श्रीकृष्ण आणि गोकुळातला बाललीला करणारा श्रीकृष्ण हे एकच आहेत, परंतु त्यांचा प्रभाव मात्र वेगवेगळा आहे. श्रीकृष्ण हे सर्व हिंदूंचे आराध्य दैवत आहे. हिंदूंना तो परमेश्वराचा अवतारच वाटतो. श्रीकृष्णाची चरित्ररेखा महाभारत, हरिवंशपुराण अशा काही ग्रंथांत रेखाटलेली आढळून येते. पण त्या-त्या ग्रंथांमध्ये काही विशिष्ट दृष्टिकोनातूनच श्रीकृष्णाच्या चरित्राकडे पाहिलेले आहे. सर्व प्रकारच्या प्राचीन ग्रंथांचा सखोल अभ्यास करून श्रीकृष्णाचे जे चरित्र मनाला भावले ते रसिक जनांसमोर मांडण्याचे काम चिंतामणराव वैद्य यांनी केले आहे. खूप अभ्यास करून व सगळीकडून संदर्भ गोळा करून हे श्रीकृष्णचरित्र चिंतामणराव वैद्यांनी लोकांसमोर ठेवले. या लोकप्रिय गंथाच्या अनेक आवृत्त्या झाल्या. सर्व लोकांना हवेहवेसे वाटेल असे हे चरित्र आहे. श्रीकृष्णाच्या जीवनातील विविध विभागाचे एक-एक पर्व कल्पून चिंतामणरावांनी चरित्राची रचना केली आहे. बालपर्व, मथुरापर्व, द्वारकापर्व, राजसूयपर्व, भगवद्गीतापर्व, युद्धपर्व अशा पर्वांची रचना करून श्रीकृष्णाच्या आयुष्यक्रमाची कथा चिंतामणराव सांगतात. या सर्व पर्वांत भगवद्गीता पर्व फारच प्रभावी आहे. गीतेचे सारच जणू या प्रकरणात वाचायला मिळेल. युद्धाला सैन्य उभे असताना श्रीकृष्ण व अर्जून यांचा संवाद कसा काय चालला होता अशा शंकेला चिंतामणराव वैद्यांनी अत्यंत समर्पक व साधार उत्तर दिले आहे. चरित्राच्या सुरुवातीसच चिंतामणराव म्हणतात की, 'श्रीकृष्णासारखा सर्वतोपरी अद्वितीय पुरुष हिंदुस्थानातच काय, पण कोणत्याही देशात आजवर झाला नाही.' अलौकिक पराक्रम, अप्रतिम बुद्धिमत्ता, असामान्य स्वार्थत्याग अंगी बाणलेला असा हा पुरुष सर्व हिंदूंच्या मनात परमेश्वराचा अवतारच बनून राहिला ह्यात नवल नाही. अशा या श्रीकृष्णाच्या चरित्राचे गुणगायन या पुस्तकात केलेले वाचकाला आढळून येईल.
लेखक: चिं. वि. वैद्य
संदर्भ क्रमांक: ११३५
