कविवर्य भूषण विरचित शिवबावनी
सारांश: कविवर्य भूषणाचा 'शिवाबावनी' नामक बावन कवनांचा हा ग्रंथ मराठी अवतरणांत प्रथमच वाचकांपुढे येत आहे. रा. काटे यांनी हे मराठी भाषांतर केले असून, ते या शिवजन्म - महोत्सवप्रसंगाने प्रसिद्ध होत आहे, ही मोठी संतोषाची गोष्ट होय. नागरी प्रचारिणी सभेमार्फत 'भूषण ग्रंथावली' प्रसिद्ध झाली असून, त्यातच शिवाबावनी हे प्रकरण छापलेले आहे. त्या ग्रंथास श्री. श्यामविहारी मिश्र व श्री. शुकदेव बिहारी मिश्र या पंडिताद्वयाने विवेचक प्रस्तावना लिहिली आहे. हिंदी साहित्यात चंदकृत पृथ्वीराजरासा व भूषणाचा 'ग्रंथ शिवराज भूषण' यांची योग्यता सर्वात मोठी मानली जाते. दोहोंतही मुख्यतः वीर, रौद्र व भयानक हे रस प्रधान आहेत. त्यातही भूषणाने श्रीशिवाजी महाराज व छत्रसाल बुंदेला हे दोन भारतमुखोज्ज्वलकारी वीरपुरुष पसंत करून, त्यांच्या वर्णनात आपली कवित्वशक्ती उपयोजिली. भूषणाचे मुख्य चार ग्रंथ प्रसिद्ध आहेत. १) शिवराज भूषण, २) भूषण हजारा, ३) भूषण उल्लास व ४) दूषण उल्लास. पैकी शेवटचे तीन अद्यापही मुद्रित नाहीत. 'शिवाबावनी' म्हणून आणखी एक त्याचा ग्रंथ आहे, तो स्वतंत्र आहे की वरील एखाद्यात समाविष्ट आहे ते सांगता येत नाही.
लेखक: कविवर्य भूषण
संदर्भ क्रमांक: २०५९
