छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर...
सारांश: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी असे उद्गार काढले होते की "छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर भारताचे काय झाले असते ते सर्व जगाला माहीत आहे. पाकिस्तानची सीमा शोधण्याकरिता फार लांब जावे लागले नसते. कदाचित ती तुमच्यामाझ्या घरापर्यंतही येऊन पोचली असती.” जिथे मुसलमानांची बहुसंख्या होती ते प्रदेश पाकिस्तानात गेले. यशवंतरावांच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की जर शिवाजी महाराज झाले नसते तर भारताच्या आणखी बऱ्याच मोठ्या भूभागावर, “कदाचित तुमच्यामाझ्या घरापर्यंतही,” मुसलमानांची बहुसंख्या झाली असती. हेच सूत्र धरून लेखकाने शिवाजी महाराजांच्या राज्याचा हेतू काय होता ते या पुस्तिकेत थोड्या विस्ताराने आणि उदाहरणे देऊन सांगितले आहे. छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर काय झाले असते याचे उत्तर भूषणाने साडेतीनशे वर्षांपूर्वीच देऊन ठेवले आहे. भारताला त्या घोर संकटातून वाचविण्याच्या श्रेयात आजच्या अफगाणिस्तानातील काबुल व झाबुल ही पूर्वीची छोटीशी राज्ये, शेकडो वर्षे इस्लामी आक्रमकांना प्रतिकार करीत राहिलेले उत्तर भारतातील राजे व विशेषत: मेवाडचे राजे, विजयनगरचे साम्राज्य, जाट, शीख, पुन्हा पुन्हा 'बंड' करत राहिलेली रयत, अशा अनेकांचा वाटा आहे. स्थलाभावामुळे या लहानशा पुस्तिकेत त्या सर्वांचा परामर्ष घेणे शक्य नाही. पण त्यांचा त्याग वाया गेला नाही. स्वत्वाकरिता त्या सर्वांनी प्रदीर्घ काळ केलेल्या संघर्षाचे छत्रपती शिवाजी महाराजांनी सार्थक केले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्याकरिता 'हिंदू' या शब्दात पारंपरिक हिंदूंबरोबरच जैन, बौद्ध आणि शीख यांचाही समावेश केला आहे. या पुस्तिकेतील हिंदू या शब्दाने लेखकाला तोच अर्थ अभिप्रेत आहे.
लेखक: गजानन भास्कर मेहेंदळे
संदर्भ क्रमांक: २०६३
