श्रीकृष्णाच्या गोष्टी
सारांश: पृथ्वीवर जेव्हा जेव्हा संकटे आलीत, त्या त्या वेळी परमेश्वराने वेगवेगळे अवतार घेतले आणि पृथ्वी व प्रजेला संकटातून मुक्त केले आहे. कृष्णजन्माच्या आधी पृथ्वीवर असुरांचा उपद्रव झाला होता; त्यामुळे सर्व जग त्रासून गेले होते. त्या वेळी पृथ्वीची अधिष्ठात्री भूमीदेवी दुष्ट राक्षसांचा संहार करून पृथ्वीला संकटातून मुक्त करावे, म्हणून गायीचे रूप घेऊन ब्रह्मदेवाकडे गेली आणि रडतच तिने आपले गाऱ्हाणे ब्रह्मदेवास सांगितले. ब्रह्मदेवास ते ऐकून वाईट वाटले. ते तात्काळ शिव इत्यादी प्रमुख देवांना घेऊन क्षीरसागराकडे निघाले. क्षीरसागर हे विष्णूंचे निवासस्थान. तेथे सर्व देव आणि भूमाता आले आणि त्यांनी भगवान विष्णूंचे स्तवन करून त्यांना प्रसन्न केले. क्षीरसागर म्हणजे दुधाचा सागर. विष्णू भगवंत ह्या दुधाच्या समुद्रात पहुडतात; म्हणून त्यांना क्षीरोदकशायी विष्णू' असेही म्हणतात. ब्रह्मदेवांनी श्रीविष्णूभगवंतास संपूर्ण पृथ्वीवरील आसुरी अत्याचारांची माहिती दिली. तेव्हा विष्णू भगवंतांनी विचार करून सांगितले, "हे ब्रह्मदेवा! पूर्ण पुरुषोत्तम भगवान आपल्या प्रबळ शक्तीसह लवकरच धरतीवर अवतरणार आहेत. ते यदुवंशीय कुळात जन्म घेतील. आपणही त्याच कुटुंबात जन्म घेऊन त्यांना साहाय्य करावे. श्रीकृष्ण भगवान हे वसुदेवांचे पुत्र म्हणून जन्माला येतील आणि या पृथ्वीवर जे असुर, दुष्ट, पृथ्वीचा भार म्हणून झाले आहेत, त्या सर्वांचा ते नाश करतील. आपण आता निश्चिंत राहावे.
लेखक: विमल वाणी
संदर्भ क्रमांक: ३०६७
