आग्र्याहून सुटका
सारांश: "बादशाही फौज अस्मानातील तारकांप्रमाणे असंख्य आहे !" असा मोठ्या मगरुरीचा जबाब मिर्झाराजे जयसिंह ह्यांनी शिवाजीमहाराजांचा जासूद " करमाजी" यांचेजवळ लिहून पाठविला. (मे १६६५ च्या सुमारास) अन् फक्त केवळ सव्वा वर्षानीच दिनांक १८ ऑगस्ट १६६६ रोजी "शिवाजीमहाराज आगऱ्याच्या नजरकैदेतून हातोहात निसटून पळून गेले." ही बातमी औरंगजेब बादशहाच्या कानावर आदळताच खरोखरच भर दिवसा उजेडी त्याच्या डोळ्यांपुढे आकाशातील असंख्य तारे चमचमू लागले !! "प्रत्यक्ष जन्मदात्या पित्याला जन्मभर कैदखान्यात डांबून, पाठोपाठचे सख्खे चार भाऊ व कुटुंबातील इतर नातलग आदी मंडळी मिळून जवळ जवळ छत्तीस जीवांची निर्घृण हत्या करून अतिशय पावन झालेल्या बादशहाच्या तख्तावर हा पाताळयंत्री, निर्दय औरंगजेब बिनदिक्कतपणे विराजमान झाला होता. अन् आता तर बापाच्या मृत्यूमुळे त्याने तर सुटकेचा निःश्वास टाकला होता. अशा ह्या पाताळयंत्री औरंगजेबाला शिवाजीमहाराजांच्या रूपाने चांगला गुरु भेटला होता. महाराजांच्या सुटकेच्या वार्तेने औरंगजेबाची मतीच गुंग झाली होती. अन् शिवरायांच्या, त्याच्या कैदेतून निसटण्याच्या घटनेमुळे साऱ्या हिंदुस्थानभर औरंगजेबाची छी थूः ! झाली होती. सर्वांच्या तोंडी एकच वाक्य घोळत होते. “सरतेशेवटी ठकाला महाठक भेटलाच !!" छत्रपती शिवाजीमहाराजांनी आग्ग्राच्या कैदेतून निसटून पाचशे मैल दक्षिणेत असलेल्या आपल्या राजधानी राजगडावर सुखरूपपणे पोहोचण्याची योजना आखली व ते त्यात सफल झाले. खरोखरच ह्या घटनेला जगाच्या इतिहासात तोड नाही, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. इतकेच नव्हे तर प्रतिकूल परिस्थितीतून शिवाजी महाराजांनी आपल्या सर्व लोकांसह, नऊ वर्षांच्या युवराज संभाजीसह, अन् बरोबर नेलेल्या सर्व मौल्यवान साहित्यासह त्यांनी सुटका करून घेतली. शिवाजी महाराजांनी ही योजना अत्यंत काटेकोरपणे, बेमालूमपणे आखली व इतक्या सफाईदारपणे अमलात आणली की गेल्या जवळ जवळ तीनशेतीस वर्षांहून अधिक काळ लोटला तरीही त्यांच्या ह्या योजनेचे संपूर्ण आकलन कुणालाही झालेले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची अत्यंत गूढ अशी ही बुद्धिबळाची चाल अजूनपर्यंत कुणालाच नीट समजलेली नाही. ज्या ज्या वेळी महाराज आपला अर्ज बादशहापुढे सादर करीत असत त्या त्या वेळी बादशहा संशयी दृष्टीने त्याची पारख करून महाराजांच्या अर्जाला नकारात्मक जबाब देऊन तो अर्ज धुडकावून लावीत होता. तसे महाराजांनी औरंगजेबाच्या विकृत मनोवृत्तीच्या विचारांचा फायदा घेण्याचे ठरविले अन् त्यांनी औरंगजेबाच्या नेमक्या त्रुटी जमेस धरून एक अर्ज पेश केला, “आपल्या भवतालची माणसे आता मला नको आहेत. त्यांना मी देशी पाठवून देण्याचे ठरवित आहे. तरी कृपया आपण तशा अर्थाचे परवाने द्यावेत व ह्या माणसांना देशी पाठविण्याची परवानगी द्यावी !!" अर्ज पाहून बादशहाला मोठा आनंद झाला. शिवा. आपली माणसे घरी पाठवून देत आहे हे फारच छान व फायदेशीर आहे. असा विचार करून त्याने परवानगी दिली व परवाने देखील लिहून दिले ! खुद्द औरंगजेब बादशहा, त्याचे शिपाई, त्याचे रजपूत सरदार, मोंगली अमीर उमराव व सरदार, दरकदार, ह्या साऱ्यांचे स्वभावविशेष महाराजांनी चांगलेच पारखले होते. तेव्हा आपली योजना यशस्वी करण्यासाठी निरनिराळे अधिकारी, वझीर, मीरबक्षी अशा बड्या बड्या धेंडाना वश करून घेण्यासाठी मिठाई वाटण्याचे ठरविले. व दरोगामार्फत, "आपले जुने व्रत 'मिठाई' वाटण्याचे चालू करण्याचे ठरविले आहे. तरी कृपया परवानगी द्यावी." असा बादशहाकडे अर्ज केला. अन् बादशहाने शिवाजीराजांचा हा अर्ज बिनदिक्कत मंजूर केला. त्या पाताळयंत्री संशयी बादशहाला यात वावगे असे काहीच दिसले नाही. इथंच महाराजांच्या युक्तीला उजवा कौल मिळाला. अन् शिवाजी महाराज आग्ग्राच्या अग्निदिव्यातून सहिसलामत निसटले. ह्या घटनेमुळे महाराजांच्या अंगातील अनेक गुण झळाळू लागले. व त्यामुळे अर्थातच स्वराज्याच्या अनेक हितशत्रूंच्या डोळ्यात झणझणीत अंजन पडले.
लेखक: प्रभाकर भावे
संदर्भ क्रमांक: २०५०
~2.jpg)