श्रीदेवी भागवत पुराण
सारांश: सामान्य जनांसाठी अठरा पुराणांत भारतीय संस्कृती आणि धर्मतत्त्वांचे विद्वान महर्षींनी संकलन केले आहे. नीती, सदाचार आणि सच्चरित्र यांचे शिक्षण देणारे आसेतु हिमाचल शिक्षक म्हणजे ही पुराणे होत.
पुराणां सर्वशास्त्राणां प्रथम ब्रह्मणां स्मृतम्।
उत्तमं सर्वलोकानां सर्व ज्ञानोपपादकम॥
म्हणजे ब्रह्मदेवाने समस्त शास्त्रांच्या पूर्वी पुराणे अवलोकिली. युगात सर्वश्रेष्ठ ज्ञान देणारी पुराणे हीच होत. ही पुराणे मुळात ब्रह्मदेवाने निर्माण केली असे म्हणतात आणि व्यासांनी त्यांना ग्रंथरूप दिले. या अठरा पुराणांत श्रीदेवीभागवत पुराणाचा उद्देश शक्ती तत्त्वाचे प्रतिपादन हा होय. शक्ती हाच विश्वाचा मूळ आधार होय. हे या पुराणात विविध कथा प्रसंगानी स्पष्ट केले आहे. गायत्रीचे महत्त्व या ओघांतच येते. सावित्रीची आगळी कथा याच पुराणात आलेली आहे. ज्ञान आणि आचार यांचा समन्वय कथा - सूत्रांतून साधण्याचा प्रयत्न जागोजागी केलेला आहे. महर्षी व्यासांच्या दिव्य प्रतिभेतून साकारलेल्या या पुराणात अनेक तत्त्वे, धर्मविचार, पदार्थविज्ञान, खगोलविज्ञान, राजनीती, समाजरचना, कर्तव्य व अकर्तव्य, कर्माचा अटळ असा सिद्धांत, पाप-पुण्य अशा नानाविध गोष्टींचा परामर्श घेतलेला आहे. यात धर्म-अधर्म, नीती व अनीती, न्याय-अन्याय, उचित-अनुचित अशा अनेक समस्यांचा ऊहापोह, कथा व उपकथा यांच्या माध्यमातून केला आहे. त्या काळातील समाजव्यवस्था, चालीरीती, भौगोलिक रचना, न्यायदानाची पद्धत अशा अनेक गोष्टींची माहिती यातून मिळू शकते. त्याशिवाय अनेक व्रते, पूजाविधींचे निरनिराळे प्रकार अशाही गोष्टींचा यात अंतर्भाव आहे. त्यामुळे अनुवाद करताना जरी साध्या सोप्या मराठी भाषेचा वापर केला असला तरीसुद्धा मूळ ग्रंथातील सर्व विषय, प्रमेये, सूत्रे व तत्त्वे यांचे तंतोतंत संस्कृतप्रमाणे स्पष्टीकरण यात आढळून येईल. शक्तिउपासना ही सर्वत्र, सर्वकाळी व सर्व धर्म, संप्रदाय, पंथ यांनी अत्यावश्यक मानलेली आहे. शक्तीचे अपरंपार महत्त्व रामदास, एकनाथ वगैरे संतांनी वर्णिलेले आहे. जिथे जिथे शक्तीचा संचार असतो तिथे तिथे सळसळणारा उत्साह असतो व चैतन्य ओसंडून वहात असते. त्या ठिकाणी यश, श्री, औदार्य आदि करून षड्गुणांचे वास्तव्य असते. पण एकदा का शक्ती निघून गेली की मग त्या ठिकाणी मृतावस्थेशिवाय काहीच नसते. एकनाथी भागवतामध्ये भगवंताच्या मुखातील एक वचन दिलेले आहे,
काम पुरवुनी द्यावया मुक्ती। काय माझे गाठी नाही शक्ती?
मी तो भक्तकैवारी श्रीपती। त्यासी अधोगती कदा न घडे॥
यापेक्षा शक्तीच्या महात्म्याचा अधिक चांगला पुरावा शोधण्याचे कारणच नाही.
लेखक: दत्ता कुलकर्णी
संदर्भ क्रमांक: ११०७
.jpg)