शिवरायांचे शिलेदार जिवा महाला
सारांश: छत्रपती शिवाजी महाराजांचे जिवाभावाचे सवंगडी त्यांच्या धैर्य, शौर्य व आत्मसमर्पणाने मराठी माणसाला माहीत झालेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबरच हिंदवी स्वराज्याची प्रतिज्ञा करून अनेक लढवय्ये धारातीर्थी पतन पावले. महाराष्ट्राच्या परदास्य विमोचनाची महान कामगिरी या सवंगड्यांनी घरदार, शेतीवाडी इतकेच नव्हे तर प्रसंगी प्राणार्पणाने केली. देहाचा बळी दिला, स्वतःच्या रक्ताचा अभिषेक केला. हिंदवी स्वराज्याचा इतिहास असा बलिदानाने घडला आहे. देवासाठी, धर्मासाठी, स्वराज्यासाठी आणि राजासाठी स्वतःच्या प्राणांचा नैवेद्य अर्पिला. महाराजांच्या अनेक साथीदारांनी स्वराज्यासाठी आपल्या आयुष्याच्या मशाली पेटविण्याचे (जणू सतीचे ) वाण घेतले होते. त्या काळातील अशा वीराग्रणींची नामावली फारच मोठी आहे. पण असे अगणित पुरुषसिंह या महाराष्ट्राच्या गडागडावर, दऱ्याखोऱ्यात, घाटीखिंडीत लढता लढता मरण पावले आहेत. त्यांची नावे -- गावेच काय पण त्यांची एकूण संख्यादेखील इतिहासाला ठाऊक नाही. परंतु इतके मात्र निश्चितच की त्यांच्या ह्या बलिदानामुळेच स्वराज्य मिळाले अन् स्वराज्य वाढले! गुराखी, धनगर, कोळी, रामोशी अन् शेतकऱ्यापासून ते कातकऱ्यांपर्यंत ही सारी अगदी अतिसामान्य माणसे होती. या निरक्षर मावळ्यांनी, अतिसामान्य माणसांनी 'सुवर्णाक्षरात लिहून ठेवावा' असा असामान्य इतिहास इथे या मातीत घडविला. कित्येक खानभाई, मियाभाई अन् जंगबहाद्दूरांना आपल्या समशेरीचे पाणी पाजले. त्यांची फटफजिती करून त्यांना पिटाळून लावले. अन् अवघ्या राष्ट्राला धडा घालून दिला की ध्येयवाद, राष्ट्रप्रेम, जिद्द अन् मनगटातील पराक्रम ह्यांच्या जोरावर अन्यायाविरुद्ध अत्याचाराविरुद्ध दंड थोपटून लढा देता येतो. हे सत्य त्यांनी वादातीत सिद्ध करून दाखविलेले आहे.
लेखक: प्रभाकर भावे
संदर्भ क्रमांक: २०४९
~2.jpg)