व्यावहारिक चित्रकला
सारांश: चित्रकला व मानव-जीवन यांचा संबंध फार पुरातन कालापासून आहे जगांतील कोणत्याही विषयाचे आधी चित्रकलेचा मानवाशी संबंध आला. ज्यावेळी जगाच्या पाठीवर मानवाची निर्मिती झाली त्यावेळी भाषेचा जन्मही झाला नव्हता. पण चित्रकलेचा मात्र त्याच्याशी निग डित संबंध होता. समाजातील व्यवहार चित्रांच्या साहाय्यानेच चालत. कोणत्याही वस्तूविषयी सांगावयाचे झाल्यास मानव ते चित्रद्वारा सांगत असे. तीच त्याची भाषा होती. पण जसजशी भाषा निर्माण होऊ लागली तसतसे चित्रद्वारा होणारे व्यवहार कमी कमी होऊन चित्रकलेचा उपयोग मनाची करमणूक करण्याकडे होऊ लागला.
मानवाच्या जीवनात जसजसा फेरफार होत गेला, तसतसा चित्र- कलेचा उपयोग निराळ्या दृष्टीने व निराळ्या प्रकारे होऊ लागला. राजेलोक आपले राजवाडे चित्रांनी सुशोभित करून घेऊ लागले. श्रीमंत लोक आपापले चित्र चित्रकारांकडून तयार करून घेऊ लागले. श्रीमंतांच्या स्त्रिया आपल्या वस्त्रावर निरनिराळी सुंदर चित्रे काढून घेऊ लागल्या. मातीच्या आणि लाकडाच्या वस्तू चित्रांनी सुशोभित होऊ लागल्या. तऱ्हेतऱ्हेचे दागदागिने तयार होऊ लागले. चित्रकलेशी आपला चोवीस तास संबंध यावा या विचाराने काही लोक स्वतःच्या अंगावर चित्रे गोंदून घेत. अजूनसुद्धा काही मागासलेल्या जमातीतील लोक अंगावर गोंदून घेतात हे तुम्हाला माहीत आहेच.
पण गेल्या १५० वर्षांपासून चित्रकलेचा उपयोग निराळ्याच प्रकारे होऊ लागला आहे. जगातील सर्व देशांना व्यापार खुला असल्याने प्रत्येक देश आपला माल दुनियेच्या पाठीवर जास्तीत जास्त खपविण्याचा प्रयत्न करू लागला. विक्री होण्यासाठी ते देश आपला माल चित्रांनी सुशोभित करू लागले. अशा प्रकारे चित्रकलेचा उपयोग व्यापारात फार मोठया प्रमाणात लोक करू लागले. आज बाजारात अशी एकही वस्तु सापडणार नाही की, जिच्यावर चित्र नाही. फूल, पान, निदान एखादी रेष व एखादा ठिपका तरी तिच्यावर तुम्हास पाहावयास मिळेल.
जगातील प्रगत देशात चित्रकलेवर बराच भर देण्यात येतो. लहान- पणापासूनच मुलांना चित्रकलेची आवड उत्पन्न होईल असे सर्व प्रयत्न केले जातात. इतर विषयांइतकेच महत्त्व चित्रकलेलाही देण्यात येते. या बाबतीत चीन आणि जपान या दोन देशांनी चित्रकला संपूर्ण आत्मसात् केली आहे. चित्रकला ही आपल्या जीवनाचा पायाच आहे अशा दृष्टीने चित्रकलेकडे पाहण्यात येते. जपानी लोकांनी तर चित्र- कलेला राबवून आपला देश जिवंत ठेवला आहे. जपानी म्हणजेच चित्र- कला व चित्रकला म्हणजेच जपानी नागरिक असे समीकरण होऊन बसले आहे. जपानमध्ये मूल साडेतीन-चार वर्षांचे झाले की, त्याला चित्र- कलेचे शिक्षण देण्यात येते. त्याच्या शिक्षणातील पहिला धडा चित्रे काढण्याचा असतो. इतर विषय मागाहून शिकविण्यात येतात. साधारण सातव्या वर्षी मुलगा ब्रशाने चित्रे काढू लागतो. सोळाव्या वर्षी तो चांगला चित्रकला बनतो. अशा प्रकारे प्रत्येक जपानी नागरिक शालेय शिक्षण घेऊन बाहेर पडताना उत्तम चित्रकारही झालेला असतो.
चित्रकलेचे शिक्षण घेतल्यावर प्रत्येकजण चित्रकाराचाच धंदा करतो असे नाही. पण जगाच्या पाठीवर कोठेही गेला तरी या कलेद्वारा तो आपला उदरनिर्वाह करू शकतो. चित्रकलेचे शिक्षण ज्याने घेतले आहे तो माणूस कोणत्याही व्यवसायात उत्तम प्रकारे प्रावीण्य मिळवू शकतो. साध्या कागदाच्या दिव्यापासून तो मोठमोठाल्या शिल्पकलेच्या कामापर्यंत सर्व कामे तो अत्यंत कुशलतेने करून दाखवितो. प्रत्येक व्यवसायात चित्रकलेचा थोडा- फार संबंध येतोच. गवंडी, लोहार, सुतार, कुंभार अगर वास्तुशास्त्रज्ञ यांना जर चित्रकलेचे चांगले ज्ञान असेल तर ते आपला धंदा फार कुशलतेने करू शकतात.
चित्रकला ही एक जागतिक भाषा आहे. कोणीही माणूस परकीय भाषा जाणत नसेल तर तो आपली कामे अगर विचार चित्राचेद्वारा दुसऱ्यास समजावू शकतो. चित्रकलेच्या ज्ञानामुळे मानवाच्या जीवनावर, त्याच्या राहणी- करणीवर व आचारविचारावर चांगला परिणाम होतो. त्याची अभि रूचि वाढते. प्रत्येक वस्तूचे सौंदर्य पाहण्याची दृष्टि त्याला प्राप्त होते. तो आपले घर नीटनेटके ठेवू शकतो, स्वच्छतेची राहणी तो आत्मसात् करू शकतो.
आज आपल्यापुढे जीवनाचा मोठा प्रश्न उभा आहे. जगातील पुढारलेले देश आपला माल दुनियेत खपविण्याचा जारीने प्रयत्न करीत आहेत, उत्तम आणि स्वस्त माल तयार करून जगाच्या बाजारपेठा काबीज करीत आहेत, जगातील संपत्ति अशा रीतीने गोळा करून आपला स्वतःचा देश संपन्न व सुखी करण्याची धडपड करीत आहेत. आपण मात्र दुसऱ्या देशाकडे पाहत अर्धपोटी राहत आहोत. याचे कारण आपल्या देशात कुशल कारागीर नाहीत, त्यामुळे उत्तम माल तयार होत नाही. आपल्या देशातील माल जोपर्यंत जगाच्या बाजारात जाऊन व्यापाराच्या चढाओढीत भाग घेऊ शकणार नाही तोपर्यंत आपल्या भारताला जगात मानाचे स्थान मिळणार नाही.
म्हणूनच भारताच्या प्रत्येक नागरिकाने चित्रकला हस्तगत करून भारताच्या प्रगतीसाठी हिरीरीने प्रयत्न केला पाहिजे. हे पुस्तक जनतेपुढे ठेवण्याचा दृष्टिकोन एवढाच आहे की, भार- ताच्या प्रत्येक नागरिकाने चित्रकलेचा परिचय करून घेऊन आपले जीवन कलापूर्ण करावे. सृष्टीतील प्रत्येक वस्तूचे सौंदर्य पाहण्याची शक्ती त्याच्यात यावी व आपली राहणी-करणी कलापूर्ण करून भार- ताला जगात मानाचे स्थान प्राप्त करण्यास त्यांनी मदत करावी.
लेखक: गजानन खरे
संदर्भ क्रमांक: ५०५७
~2.jpg)