श्रीरामरक्षाभावार्थसार
सारांश: श्रीरामरक्षा हे सर्वांचे आवडते स्तोत्र आहे. लहानपणापासून कित्येकजण ते म्हणत आलेले असतात. अगदी लहान अर्भकाजवळ रामरक्षा म्हणून त्या बालकाचे सर्व आपदांपासून रामाने रक्षण करावे अशी प्रार्थना केली जाते. असे असले तरी या स्तोत्रातील कित्येक शब्दांचा अर्थ म्हणणाऱ्यांना माहीत नसतो. स्तोत्रातील वाङ्मयसौंदर्य आणि भावसौंदर्य हे अजूनच वेगळे, फारसे ध्यानात न येणारे, असे आहे. कित्येक विधानांचा लक्षणार्थ सूक्ष्म असून आपले जीवन उन्नत करून घेण्यासाठी प्रेरणादायक आहे. उदाहरणार्थ, 'हाती सज्ज धनुष्यबाण घेतलेले, राम-लक्ष्मण माझे रक्षण करीत सदैव माझ्या मार्गावर पुढे चालावेत', याचा भावार्थ आहे, की मी त्यांच्या मागे चालावे, म्हणजे कर्तव्यतत्पर राम-लक्ष्मणांचा आदर्श सदैव डोळ्यासमोर ठेवून मी जीवनपथावरून चालावे, त्यामुळे आपोआपच माझे रक्षण होईल. अशी अनेक सूक्ष्म भावार्थाची सौंदर्यस्थळे या स्तोत्रात आहेत. नागपूरचे प्रा. श्री. अरुण केशवराव देशपांडे यांच्या 'श्रीरामरक्षास्तोत्र एक चिंतन' (मराठी पद्य अनुवादासह) या पुस्तकात मानवी शरीराचे अवयव आणि त्यांचे रक्षण श्रीरामाने करावे यासाठी योजलेली रामनामे यांचा परस्पर संबंध यांवर विवरण केले आहे. वाचकांसाठी ह्या पुस्तकातील सुंदर पद्यानुवाद व विवरण आस्वादनीय व मननीय आहे. सांप्रतच्या 'श्रीरामरक्षाभावार्थसार' मधील विवरण हे थोडे वेगळे, योगपर असून रामायणातील कथाप्रसंगांसह अधिक विस्तृतपणे केलेले आहे. हे भावार्थ ध्यानात घेऊन रामरक्षा म्हणणे हे स्तोत्राच्या मुळात असलेल्या गोडीबरोबर धारणांची पुष्टीही प्राप्त करून देईल. श्रीरामाने प्रेरणा देऊन हे जे भावार्थ विवरण करून घेतले ते सर्वांच्या अंतर्यामी असलेल्या श्रीराम-सीता यांच्या चरणी वंदनपूर्वक अर्पण असो!
लेखक: स्वामी माधवानंद
संदर्भ क्रमांक: १११६
