नंदनार
सारांश: सहाशे वर्षांपूवीची गोष्ट आहे. दक्षिण हिंदुस्थानच्या तंजावर जिल्ह्यात अदनूर नावाचं एक गाव होतं. गाव तिथं महारवाडा हा असायचाच. दारिद्र्य, अज्ञान आणि घाण ही सगळ्या महारवाड्यांची पिढीजाद मिराशी. अदनूरच्या महारवाड्यालाही त्याचा भरपूर वाटा मिळाला होता. तिथले स्त्री-पुरुष कोणी शेतात काम करीत, कोणी घाणीच्या पाट्या उचलीत, कोणी ढोरं ओढीत, तर कोणी मेलेल्या जनावरांची कातडी काढीत अन् अशा रीतीने दिवसभर देह राबवून संध्याकाळी दारू पिऊन झिंगत झिंगत घरी येत. आपली सगळी दुःखं अन् अपमानाची सलं विसरायला दारू हे एक त्यांना साधन होतं. त्या वाड्यातल्या एका झोपडीत एक मुलगा जन्माला आला होता. आईबापांनी नंदनार असं त्याचं नाव ठेवलं होतं. बाप एका अय्यरच्या शेतात काम करी. आईही त्याच्या मदतीला जाई. नंदनार एकटाच झोपडीत असायचा. कधी कधी शेजारची पोरं त्याच्याबरोबर खेळायला येत. पण त्यांच्या सहवासात तो विशेषसा रमत नसे. त्याचे जिवाचे सवंगडी म्हणजे कुत्रा, डुकरीची पोरं अन् कोंबडीची पिलं. कुत्रा सावलीसारखा त्याच्या आगेमागे राही. डुकरीची पोरं त्याच्या मांडीवर लोळत अन् कचऱ्याचे ढीग उकरणारी कोंबडीची पिलं, त्यानं हाकारताच तुरुतुरु धावून त्याच्या पायाशी येत. त्यांची भाषा त्याला समजे अन् त्याचं हृद्गत ती जाणत. संध्याकाळी आई घरी आली की धुळीनं माखलेल्या अंगानं नंदनार तिच्या कमरेला मिठी घाली. तिनं मातीच्या परळात ओतून दिलेली पेज घटाघटा पिऊन घेई अन् झोपेनं डोळे पेंगुळले की शेकोटीच्या उबाऱ्याला आडवा होई...
लेखक: महादेवशास्त्री जोशी
संदर्भ क्रमांक: ३०४४
