पंचदेव उपासना भाग ४ - श्री विष्णू उपासना
सारांश: प्रस्तुत पुस्तकात भगवान् श्रीविष्णू महात्म्य वर्णिले आहे, जो भारतीय दैवत-शास्त्रातील प्रमुख देव आहे. श्रीविष्णूच्या नावाचे पुराणही निर्माण झाले आहे. या पुराणातून त्याच्या उपासनेची विधिविधाने कोणती, तेही सांगितले आहे. त्याच्या आधारावर मी भगवान् श्रीविष्णूची उपासना विशद केली आहे. उपासनेचे रहस्य - एखाद्या देवाची पूजा करणे म्हणजे त्याची उपासना करणे, असे सामान्य जनांना वाटते. पण ते पूर्णपणे खरे नव्हे. पूजा हे उपासनेचे फक्त एक अंग आहे. पूजा, ध्यान, चिंतन, उपवास, पारणा, कथाश्रवण, व्रत, उपायन, दक्षिणा, ब्राह्मणभोजन, मंत्रजप, पुरश्चरण, स्तोत्र, प्रार्थना, विधि-निषेध एवढे सगळे मिळून उपासना बनते. उपास्याची मानसपूजा हाही उपासनेचाच एक प्रकार होय. आपण सर्वांआधी उपासनेचे रहस्य काय, ते नेमके समजून घेतले पाहिजे. उप + आस मिळून उपासना शब्द बनतो. त्याचा अर्थ उपास्याच्या जवळ पोचणे, मनाने त्याच्या जवळ राहणे असा आहे. उपासक तसा उपास्याजवळ पोचला, की मग इष्ट देवतेच्या कृपाप्रसादाने त्याला कृतार्थता लाभते. उपासना फलप्रद होण्यासाठी उपासकाच्या अंतरात भक्तीचा उदय व्हावा लागतो. भक्तीने उपासनेतला शुष्कपणा जाऊन तिला आर्द्रता येते. तिचे प्रत्येक अंग भावस्निग्ध होते. भक्ती हा उपासनेचा प्राणच आहे. उपासनेचे भेद - सकाम व निष्काम असे उपासनेचे दोन भेद आहेत. सकाम उपासनेत विशिष्ट कामनेची पूर्ती अपेक्षित असते. पुष्कळसे उपासक बहुधा सकामच असतात. अशा उपासकांची सोय व्हावी म्हणून कोणत्या कामनेसाठी कोणत्या देवाची कशी उपासना करावी, हे पुराणे व तंत्रग्रंथ यांत सांगितले आहे. निष्काम उपासना मात्र केवळ मोक्षाच्या उद्देशानेच केली जाते. उपासनेतील उपास्य हे आधिदैविक जगातील सूक्ष्म तत्त्व असते. आधिभौतिक नाम, रूप व कर्म यांचा आध्यात्मिकाशी सांधा जोडणे हे त्या आधिदैविकाचे कार्य असते. सगुण उपासनेत उपास्य व उपासक हे दोन्ही शरीरधारी असतात. त्या उपासनेत देहबुद्धी जागृत असते, ती हळूहळू, क्षीण होत जाऊन त्या ठिकाणी ब्रह्मात्मैक्य बुद्धी स्थापित होणे, ही उपासनेची परिणती समजावी.
प्रकाशक: प्रोफीशिएंट पब्लिशिंग हाउस
संदर्भ क्रमांक: १११५
