हिंदू धर्माची रचना
सारांश: अपौरुषेय वेदांपासून पुराणांपर्यंत हिंदू धर्माचे सैद्धान्तिक वा उपपत्त्यात्मक अंग व्यवहार्य करण्यासाठी चार पुरुषार्थ, चार वर्ण, चार आश्रम, चार ऋणे, पंचयज्ञ आणि कर्मविपाक यांचे सदाचरण हिंदूधर्म शिकवितो. हिंदू धर्म उभा आहे चार चतुष्कांच्या चार मजबूत स्तंभांवर! ही चार चतुष्के आहेत, चार पुरुषार्थ - धर्म, अर्थ, काम, मोक्ष. चार वर्ण - ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. चार आश्रम - ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास. चार ऋण - देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि मनुष्यऋण. या चारही चतुष्कांचे निष्ठापूर्वक आचरण करणे म्हणजेच हिंदू धर्म होय. याशिवाय पंचयज्ञ, कर्मविपाक आणि श्रेयसाचा विचार-आचार हेही हिंदू धर्माचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. चार पुरुषार्थ : हिंदू धर्माच्या नीतीचे एक प्रमुख तात्त्विक अधिष्ठान म्हणजे चतुर्विध पुरुषार्थ होय. धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे ते चार पुरुषार्थ आहेत. यापैकी अर्थ व काम हे प्रवृत्तीपर म्हणजे अभ्युदयाचे पुरुषार्थ आहेत. धर्म आणि मोक्ष निःश्रेयसाचे पुरुषार्थ आहेत. अर्थ व काम यांच्या तृप्तीची मानवाच्या आयुष्यात उपलब्ध नाही. आवश्यकता असते ते प्राप्त झाल्याशिवाय मानवी आयुष्याला साफल्य वाटत नाही. परंतु सदाचाराची चौकट त्यांना नसली तर अर्थ व कामामुळे मनुष्य उन्मत्त होण्याची शक्यता असते. हे होऊ नये म्हणूनच अर्थ व कामाला धर्म व मोक्षाच्या सीमारेषांनी बांधले आहे. अर्थ व काम सदाचाराच्या चौकटीतच सेवन करण्याचा धर्मशास्त्रांचा आग्रह आहे. धर्म हा अर्थ व कामाचा मार्गदर्शक आहे. तो त्यांना उन्मत्त न होण्यासाठी मार्गदर्शन करत असतो.
लेखक: शंकर अभ्यंकर
संदर्भ क्रमांक: १११८
