चार वेद
सारांश: हिंदू धर्म-संस्कृतीतील ऋषि-मुनि - आचार्यनिर्मित वाङ्मय महासागरासारखे विशाल आणि मन-बुद्धी थक्क करणारे आहे. चार वेद, सहा वेदांगे, चार उपवेद, अठरा महा पुराणे, अठरा उपपुराणे, तेरा ब्राह्मणे, सुविख्यात सहा आरण्यके, अराध उपनिषदे, षड्दर्शने हे सर्व वैदिक वाङ्मय आहे. याशिवाय सम्प्रदाय, दर्शने, भक्तिसंघटना, परंपरा यातील शेकडो आचार्यांनी- संतांनी वेदकाळापासून आजपर्यंत प्रचंड लेखन केले आहे. यापैकी वेदांना अपौरुषेय समजले जाते. ऋषींनी वेद लिहिले नाहीत. त्यांना ईश्वरी कृपेने ते दिसले. त्यांनी ते ग्रथित केले असा भावार्थ! हे वाङ्मय एकदम निर्माण झाले नसून सहस्रावधी वर्षांच्या कालखण्डात टप्प्याटप्प्याने निर्माण झाले आहे. वेदवाङ्मय हे 'अक्षर' आहे. वाङ्मयाचे नाते मानवाच्या अंतरंगाशी म्हणजे प्रामुख्याने मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांच्याशी असते. वेदांनी मानवाला शाश्वत सुखाचा आणि दुःखांच्या कायमच्या निवृत्तीचा मार्ग आत्मानुभूतीने सांगितला, दाखविला आहे. मानवाचा विचार-उच्चार-आचार जितका शुद्ध होत जाईल तितका हा मार्ग सोपा होत जातो. पूर्णत्वाकडे जाण्याचा प्रयत्न केवळ मानवच करतो. म्हणूनच वेदांनी हा श्रेयस्कर मार्ग अवघ्या मानवांना दाखविला आहे. धर्मकारण, राजकारण, अर्थकारण, समाजकारण, वाङ्मय, विज्ञान, कला व शिक्षण ही संस्कृतीची प्रधान अंगे असतात. आचार्य वाङ्मयाने या सर्व अंगांना स्पर्श केला आहे. अर्थात् वेदवाङ्मय सर्वदेशी आहे. हिंदू धर्मात सर्वाधिक महत्त्व वेदांना आहे. 'वेदोऽखिलो धर्ममूलम्' हे आचार्य मनूंचे वचन सर्वश्रुत आहे. अखिल वेद हेच हिंदू धर्माचे मूळ आहेत. या ग्रंथात हिंदू धर्माचे अधिष्ठान असलेल्या चार वेदांचा संक्षिप्त परिचय दिला आहे.
लेखक: शंकर अभ्यंकर
संदर्भ क्रमांक: १११२
