सार्थ श्रीशिवनामावली
सारांश: श्रीभगवान शंकर हे संपूर्ण आध्यात्मिक विश्वाचे, योग संप्रदायांचे आदिगुरू आहेत. नाथ संप्रदाय या ध्यानयोग संप्रदायाचे ते प्रवर्तक आहेत म्हणून त्यांना 'आदिनाथ' असे म्हटले जाते. 'शं' म्हणजे कल्याण आणि 'शंकर' म्हणजे कल्याण करणारा. योगसाधनेबरोबरच, ॐकार आणि सोऽहं हे मंत्र, तसेच रामनामाचे प्रेम हे सर्व साधकविश्वाला देऊन, जगात प्रसृत करून त्यांनी सगळ्यांचे कल्याण केले आणि शंकर म्हणजे कल्याण करणारा हे आपले नाम सार्थ केले. शंकर हे योगज्ञानाचे सागर या अर्थाने त्यांना 'ज्ञानसिंधू' असे म्हटले जाते. जगात ज्ञानाइतके पवित्र दुसरे काही नाही म्हणून शंकरांना 'शिव' म्हणजे पवित्र हे नाम पडले. अशा विविध अर्थांच्या १०८ नामांची मालिका 'शिवनामावली' म्हणून प्रसिद्ध आहे. या नाममालेतील सर्व नामांचे अर्थ आणि काही नामांशी जोडलेल्या कथा या पुस्तिकेत दिल्या आहेत. योग - ज्ञानाप्रमाणे, भगवान शंकर हे नृत्य - गायनादी विविध कलांची देवता आहेत. ते विलक्षण सामर्थ्यशाली आणि तितकेच कृपानिधी- करुणाकर आहेत, हे त्यांच्या विविध कथांमधून प्रकट होते. या नाममंत्र मालिकेतील काही नामे भगवान शिवांच्या अवतार - लीलांमधील कथाप्रसंगांवर आधारित आहेत. तसेच त्यांची गुणवाचक संबोधने, त्यांचे ईश्वरस्वरूप, त्यांचे रौद्रस्वरूप, त्यांची शस्त्रास्त्रे, त्यांची सगुण मूर्ती, त्यांचा वेष, त्यांनी धारण केलेले सर्प, चंद्र, गंगा, त्यांचे वाहन, निवास, कुटुंब, काया यांचे वर्णन करणारीही काही नामे आहेत. या सगुण ईश्वरस्वरूपाचे वर्णन करणाऱ्या नामांबरोबरच, त्यांच्या परमात्मतत्त्व स्वरूपाचेही यथोचित वर्णन करणारी काही नामे या मालिकेमध्ये आहेत. विविध अंगांनी भगवान श्रीशिवशंकरांचे वर्णन करणारी ही सर्व नामे विषयांनुरूप विभागून या मालिकेत आलेली नसून, स्फुरणानुसार आलेली आहेत. त्यामुळे या नामावलीत सगुण ईश्वरस्वरूप, त्याच्या कथा व त्याचे माधुर्य आणि आध्यात्मिक तत्त्वस्वरूपाचे तेज या सर्व गोष्टी सहजपणे एकवटून एकरसतेने साकार झालेल्या आहेत. ही १०८ नामे नुसती उच्चारली, तरी मनाला शांती आणि पावित्र्य प्राप्त होतेच, पण जर त्या नामांचे अर्थ समजून ती नामे उच्चारली, तर एकाग्रता आणि आनंदही प्राप्त होतात. या नामोच्चाराबरोबर शांती, पावित्र्य, एकाग्रता आणि आनंद सर्वांना प्राप्त व्हावा हे या पुस्तिकेचे प्रयोजन आहे.
लेखक: स्वामी माधवानंद
संदर्भ क्रमांक: ११०८
