ॠतूध्वज
सारांश: मोठ्या पहाटेस गालवमुनी जागा होऊन आश्रमाच्या बाहेर आला. कृत्तिकांचा पुंज पश्चिमेला मावळत आहे अन् व्याधाचा बाण उरी लागून घायाळ झालेलं मृगनक्षत्रही क्षितिजाखाली अंग टाकायला उत्सुक झालं आहे. हे पाहून त्याला वाटलं की, आता जेमतेम दोन घटका रात्र उरली असेल. लगेच त्यानं कमंडलू उचलून नदीची वाट धरली. झटपट स्नानसंध्यादी प्रातः कर्मे उरकली. 'रविराज मंदिरी येणार' म्हणून मुखकांती खुललेल्या पूर्वेला प्रणाम करून उषासूक्त म्हणत तो आश्रमात आला. आता फक्त होमशाळेत जाऊन अग्नीला समिधा देणं एवढंच नित्यकर्म उरलं होतं. ते झाल्यावर त्यानं अंगणातल्या मंदाराच्या झाडाला बांधून ठेवलेल्या घोड्याला सोडलं आणि त्याच्या गळ्यातील दोरी हाती धरून तो वाट चालू लागला. घनदाट अरण्यप्रांत ओलांडून गालव जेव्हा बाहेर पडला, तेव्हा दिवसानं पहिला प्रहर ओलांडला होता. पक्ष्यांची किलबिल अन् वन्य पशूंची खजबज आता ऐकू येत नव्हती. आता त्याच्यापुढं खुलं मैदान पसरलं होतं अन् तांबड्या मातीचा एक राजरस्ता त्या मैदानातून जात होता. गालवानं त्या रस्त्यावर पाय ठेवला आणि ज्या दिशेला जायचं होतं ती दिशा क्षितिजाच्या डोंगरकडेपर्यंत न्याहाळून घेतली. हातातल्या हिरव्या चाऱ्याचा शेवटचा घास घोड्याच्या तोंडात दिला आणि मग त्याची पाठ थोपटून त्याला म्हटलं, “आता झपझप पाय उचल हं. मध्यान्हाच्या आत आपल्याला राजधानी गाठली पाहिजे. " रस्त्यावरून येणारे वाटसरू त्या घोड्याला पाहून थबकत. त्यांच्या नजरा घोड्यावर खिळून राहात. असलं उमदं जनावर एका म्हाताऱ्या ब्राह्मणानं हाती धरून चालवलं आहे, म्हणून त्यांना अधिकच नवल वाटे. त्या गमतीदार जोडीबद्दल ते आपसांत काहीतरी कुजबुजत अन् पुढे जात. पण गालवमुनींचं त्या गोष्टीकडे मुळीच लक्ष नव्हतं. तो देहानं पुढे जात होता; पण त्याचं मन नजीकच्या भूतकाळात रेंगाळत होतं. मध्येच त्याचे डोळे रागीट दिसत, तर मध्येच त्यांच्यावर विषादाची छाया तरळे. कारण कालच्या दिवशी घडलेला प्रकार होताच तसा!
लेखक: महादेवशास्त्री जोशी
संदर्भ क्रमांक: ३०४५
