यज्ञसंस्था
सारांश: मानवाच्या ऐहिक व पारलौकिक आकांक्षांचा उत्तम समन्वय साधणारी, सांस्कृतिक अनुबंध दृढ करणारी आणि मानवी जीवनाच्या अनेक अंगांना स्पर्श करणारी एक भव्य आणि दिव्य धार्मिक, सामाजिक व राष्ट्रीय संस्था म्हणजे यज्ञ होय. प्राचीन कालखण्डात यज्ञाने अनेक सामाजिक संस्थांना समृद्ध केले होते. आधुनिक काळात दिसणाऱ्या सर्व व्यावसायिक, शैक्षणिक आणि शास्त्रीय संस्था पूर्वी यज्ञाच्या आश्रयानेच जगत असत. तात्पर्य, यज्ञ हा मानवाच्या आत्मोद्धारासाठी, समाज- राष्ट्र यांच्या एकात्मतेसाठी, निसर्गाच्या धारणेसाठी आणि पर्यायाने विश्वकल्याणासाठी आहे. यज्ञकुंडात अग्नीला केवळ आहुती देणे असा यज्ञाचा संकुचित अर्थ नसून यज्ञ संकल्पनेत अत्यंत व्यापक असा विश्वात्मक भाव आहे. संपूर्ण विश्वालाच वैदिक आचार्य यज्ञ मानतात. यज्ञ हे देवतांना संतुष्ट करणारे त्यागप्रधान कर्म आहे. म्हणूनच आदि शंकराचार्यांनीही पंचायतन पूजेच्या जोडीला पंचयज्ञाचा पुरस्कार आग्रहाने केला होता. ब्रह्मयज्ञ (अध्ययन अध्यापन इ.), देवयज्ञ (लोककल्याणाची मंगल कर्मे इ.), पितृयज्ञ (तर्पण, श्राद्ध, वंशविस्तार इ.), मनुष्ययज्ञ (अतिथीचा सत्कार, तीन ऋणे अंशतः फेडणे इ.) आणि भूतयज्ञ (निसर्गधारणेसाठी निसर्गचक्र खंडित न होईल असे आचरण, सर्व प्राणिमात्रांप्रती दया इ.) हे पंचयज्ञ म्हणजे यज्ञाच्या व्यापक अनुभूतीचे आणि व्यक्ती महान अधिष्ठान आहेत.
लेखक: शंकर अभ्यंकर
संदर्भ क्रमांक: १०२१
