अकरा प्रधान उपनिषदे
सारांश: उपनिषदे म्हणजे ब्रह्मविद्येचा कळस होय. संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद असे वेदांचे चार भाग होतात. उपनिषदांचा क्रम त्यात चौथा असला तरी उपनिषदे म्हणजे तत्त्वज्ञानरूपी मंगल मंदिराचा कळस आहे. वैदिक प्रस्थानत्रयीत उपनिषदांचे स्थान श्रुतिप्रस्थानाचे आहे. 'उपनिषद' या संज्ञेत 'सद्' = बसणे हा प्रमुख धातू आहे. त्या धातूला उप आणि नि हे दोन उपसर्ग लागून 'उपनिषद' ही संज्ञा सिद्ध झाली आहे. अत्यंत विशुद्ध भक्तिभावाने गुरूजवळ बसून शिष्य जी परमार्थविद्या गुरूकडून संपादित करतो, त्या भक्तिज्ञानयुक्त ब्रह्मविद्येला उपनिषद असे म्हणतात. उपनिषद म्हणजे आत्मविद्या वा ब्रह्मविद्या होय. प्राचीन भारतातील आचार्यांनी परा विद्येद्वारा आत्मानुभूती घेतली आणि विश्वकल्याणासाठी हा आत्मानुभव ग्रथित करून ठेवला. शंकराचार्यांनी या आत्मज्ञानाला 'अविद्याविध्वंसिनी ब्रह्मविद्या' (अर्थात अविद्येचा विनाश करणारी ती ब्रह्मविद्या होय) असे म्हटले आहे. वैदिक वाङ्मयात उपनिषदे शेवटी येतात, म्हणून त्यांना 'वेदान्त' अशी संज्ञा लाभली आहे. उपनिषदे ही वेदांचे ज्ञानकाण्ड असल्यामुळे त्यांना 'ब्रह्मविद्या' अशाही संज्ञेने ओळखले जाते.
लेखक: शंकर अभ्यंकर
संदर्भ क्रमांक: १०२२