शिवमूर्तये नम:
सारांश: भारतीय आध्यात्मिक विचारसरणीवर तंत्रमार्गा (वाममार्ग) चा प्रभाव पडल्याचेही आढळते. शाक्त, कौल, कापालिक हे ते मार्ग होत. उच्छिष्ट गणेश, छिन्नमस्ता (लज्जागौरी), अशा मूर्तीचा उल्लेख यासंबंधात करता येईल. अशा मूर्तीची खरी ओळख व्हायची तर तंत्रमार्गासंबंधीची योग्य माहिती असायला हवी; नाहीतर अशा मूर्तीकडे पाहून अपसमज होण्याची शक्यताच अधिक असते. मूर्तिशास्त्राचा विचार करताना आणखी एका मुद्दयाचा विचार करावा लागतो. भारतीय परंपरेचा इतर देशांतील विशेषतः आग्नेय आशियायी देशांतील परंपरेवर झालेला परिणाम तसेच बाहेरील देवतांचा आपल्याकडील दैवतशास्त्रावर पडलेला प्रभाव विचारात घेण्यासारखा आहे. कुषाणकाळात म्हणजे इसवीच्या प्रारंभीच्या दोन-तीन शतकांत वायव्येकडून आलेले ऑरडोक्शो व फॅरो गांधारकलेत हारिती व कुबेर झाले, तर हेलिओस या नावाने सूर्याने भारतात प्रवेश केला. एवढेच नव्हे, तर सूर्यवाचक 'हेली' हा शब्दही संस्कृत कोशात समाविष्ट झाला. याच काळात येथील शिव, विष्णू इत्यादी देवतांनाच नव्हे, तर बुद्ध व मैत्रेय यांना मिशा दाखवल्या गेल्या. खट्वांग, कार्नुकोपिया (निधीशृंग) या वस्तूही हातात दिल्या गेल्या, तर सूर्याच्या नि क्वचित कार्तिकेयाच्या पायांत बूट आले, अव्यंग (इराणी भाषेतील यावियांग) कटिसूत्र आले. मूर्तिशास्त्र अर्थातच धर्माशी निगडित असते. मात्र मूर्तीचा, त्यांच्या उद्भवप्रक्रियेचा डोळसपणे विचार केला तर त्यांचेमुळे समाजपरिवर्तन, समाज- प्रबोधन आणि सामाजिक अभिसरण कसे होत गेले यासंबंधीचा एक सुंदर आलेख तयार करता येतो. उदाहरणादाखल आदिवासी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शबर, भिल्ल, किरात इत्यादी समाजांचे परिवर्तन होऊन त्यांच्या देवतांसह ते शिष्ट समजल्या जाणाऱ्या समाजात समाविष्ट झाले. तर देव आणि दैत्य यांच्या संघर्षावर आधारलेल्या कथाद्वारे प्रबोधन घडवून आणले गेल्याचे स्पष्ट संकेत अशा मिथ्यकावरून निर्माण केलेल्या प्रतिमांचे आधारे दाखविता येतात. तसेच महाविलयनप्रक्रिया म्हणून मूर्तिशास्त्रात ओळखली जाणारी पद्धत अभिसरणाचे सुंदर उदाहरण ठरते. लिंगपूजकांचे शिवोपासकांशी झालेले सम्मीलन, अवैदिक असलेल्या वृक्ष, नाग इत्यादी उपासनाप्रतीकांना शिष्ट समाजाकडून मिळालेली मान्यता, बुद्ध व ऋषभ यांची विष्णूच्या अवतारात झालेली गणना ही सारी सामाजिक अभिसरणाचीच उदाहरणे होत.
लेखक: डॉ. गो. बं. देगलूरकर
संदर्भ क्रमांक: १०३३
