निवडक आरती संग्रह
सारांश: मराठी भाषेतील आरत्या हे भक्तिरसप्रधान काव्यमंदिरातील एक स्वतंत्र देवघर आहे. या देवघरात परमेश्वराचे सुरम्य, सगुण स्वरूप आणि आर्त भक्तीने हेलावलेला भक्त याशिवाय इतर काही दिसावयाचे नाही. देव आणि भक्त यांच्यामधील पूज्य-पूजकसंबंधाचे साक्षात् दर्शन घडविणारे निर्मळ आरसे म्हणजेच या आरत्या होत! या आरत्यातील कोणतीही एक ओळ वाचली तरी याची प्रचीती आल्यावाचून राहाणार नाही. टाळ-मृदंगांच्या गंभीर आणि स्फूर्तिदायक साथीवर ज्या वेळी उपास्यमूर्तीसमोर या आरत्यांचे गायन भक्तजन प्रेमभराने करू लागतात, तेव्हा सगुणभक्तीच्या साक्षात्काराने ज्यांची शरीरे आणि मने पुलकित झाली नाहीत अशी माणसे विरळाच! मराठी भाषेतील आरत्या केवळ मराठी भाषा बोलणाराचीच हृदये भक्तिवश करतात असे नाही, तर इतर मातृभाषा असलेल्या लोकांची हृदयेही मराठी भाषेतील आरत्यांच्या गायनाने भक्तिवश होत असलेली आढळून येतात. आरती म्हटले की डोळ्यासमोर तबक, त्यात तेवणारी निरांजने, फूल-धूप-उदबत्ती यांचा संमिश्र सुवास आणि भक्तासमोर असणारी त्याची इष्ट देवता असे चित्र क्षणार्धात उभे रहाते. आरती ही आर्त भावाने ईश्वराला घातलेली साद आहे. अशा निवडक २२ आरत्या येथे देत आहोत. चरण नेमका कोठे तोडावा हे कळण्यासाठी स्वल्पविराम दिले आहेत. प्रत्येक आरतीमध्ये त्या आरतीच्या शेवटी कर्त्याचे नाव असते. ते मुद्दाम तिरक्या अक्षरात दिले आहे. शेवटी दिलेली प्रार्थना आणि मंत्रपुष्पांजली यानी प्रतिदिनी आरतीची सांगता करावी. आपल्या नित्य कर्मासाठी बाहेर पडताना अथवा सायंकाळी इष्ट देवतांची आरती नित्यनेमाने केल्यास आपल्या मनात सात्त्विक भाव निर्माण झाल्याशिवाय राहाणार नाही.
संदर्भ क्रमांक: १००७
