वेरूळ दर्शन


सारांश: वेरूळ येथील विश्वविख्यात लेणी पाहण्यासाठी जगभरातील कलारसिक तेथे जात असतात. तेथे जाणारी काही मंडळी अभ्यासू, काही जिज्ञासू, तर काही हौशी असतात. त्या सर्वांनाच उपयुक्त ठरावे अशा रीतीने या लेणीसंबंधात लिहिणे तसे अवघडच. वेरूळास जाणाऱ्या सर्वांना रुचेल, भावेल व पटेल अशा पद्धतीने तेथील लेण्यांची माहिती देण्याचे येथे धाडस केले आहे. इसवीपूर्वीच्या तिसऱ्या शतकात मौर्य सम्राट अशोक (इसवीपूर्व २७३ ते इसवीपूर्व २३६) याने डोंगर कोरून लेणी तयार करण्याला प्रारंभ केला होता असे इतिहास सांगतो. अशा प्रकारच्या वास्तूंना वा स्थापत्याला फार साजेसे नामाभिधान कार्ले (जि. पुणे) येथील लेण्यांतील शिलालेखात आढळते. शैलगृह (सेलिय घर) असे ते नाव. महाराष्ट्रात या स्थापत्यप्रकाराला आश्रय व चालना दिली ती पैठण (पूर्वीचे प्रतिष्ठान) येथील सातवाहन कुलातील राजांनी. पुढे मग वाकाटक, कलचुरी, चालुक्य, राष्ट्रकूट आणि शेवटी शिलाहार या राजकुलांनीही लेणी निर्माण केली. एकापरीस एक सुंदर, विशाल नि प्रेक्षणीय लेणी कोरण्याची जणू चढाओढच त्यांच्यात लागली होती. हिंदुस्थानात सुमारे चौदाशे लेणी आहेत. पैकी महाराष्ट्रात सर्वाधिक आहेत. त्याचे मुख्य कारण अशा प्रकारच्या वास्तुसंप्रदायास अनुकूल असणारा सह्याद्री. या पर्वताने महाराष्ट्राचा इतिहास जसा घडविला तसाच स्थापत्यकलेच्या क्षेत्रात नवा अध्याय सुरू करून त्यावर कळसही चढविला. वेरूळचे कैलास लेणे हे त्याचे उदाहरण. रम्य डोंगरदरीत (अजिंठे), नदी-ओहळांच्या निसर्गरम्य वाकणात (पन्हाळे काजी), तत्कालीन व्यापारी- मार्गावरच पण वर्दळीपासून थोडेसे दूर (कार्ले - भाजे पितळखोरे) ही सर्व लेणी बौद्ध भिक्षूंच्या अध्ययन- अध्यापन, ध्यानधारणा व निवासासाठी निर्माण केली गेली आणि विशेष म्हणजे केवळ छिन्नी व हातोड्यांच्या साहाय्याने ही अजस्त्र कामे केलेली आहेत. टणक नि निधड्या छातीच्या डोंगरांच्या कुशीत श्रद्धेने व निष्ठेमुळेच ही कोरली गेलेली घरे होत. म्हणून तर ही धार्मिकांची तीर्थ / श्रद्धास्थाने झाली आणि कलोपासकांची श्रद्धा/कलाकेंद्रे ठरली. अगदी उपनिषदातील वर्णनाप्रमाणे 'मनोऽनुकूले न चक्षुपीडने ' असलेली ही लेणी भारताची लेणी ठरली हे खरे.

लेखक: डॉ. गो. बं. देगलूरकर

संदर्भ क्रमांक: १०४०

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र