गुणकारी मध
सारांश: मध, मधमाशा आणि विविध प्रकारची फुले यांचा निकटचा संबंध आहे. म्हणूनच आपल्याला शुध्द स्वरूपातील मध मिळू शकतो. मध-मकरंद - शहद या शब्दांतूनच गोडवा झिरपतो, मधुरता स्पष्ट होते, कारण मध हे बहुगुणी अमृतासमानच आहे. आहारातून मधाचे सेवन केल्यास आरोग्यास अनेक प्रकारे लाभ होतो. मधाचे सेवन केल्याने कफाचा जोर कमी होतो व उत्साह निर्माण होतो. पोटाच्या तक्रारींवरही मध गुणकारी आहे. रोज सकाळी १ ग्लास थंडगार पाण्यात चहाचे दोन चमचे मध टाकून एकजीव करून घेतल्यास पोटातील विकार बरे होतात. याशिवाय डोकेदुखी, हातपाय दुखणे, संधिवात यांवरही मध म्हणजे गुणकारी औषध आहे. अगदी वृध्दावस्थेतही मधाच्या सेवनाने शक्ती वाढते. चेहऱ्याला सुध्दा मध लावल्याने सावळेपणा निघून जातो. सुरकुत्या दिसत नाहीत. मुरमे निघून जाऊन चेहऱ्याची त्वचा कोमल, मुलायम व तजेलदार होते. पण मध हा शुध्द स्वरूपाचाच असावा. कारण मधात पुष्कळ वेळा भेसळ केली जाते. त्यातून अपाय होण्याचीच शक्यता जास्त असते. मध हे केवळ औषधी म्हणूनच वापरले जाते, असे नाही तर आरोग्य संपन्नता टिकवून ठेवण्यसाठी सुध्दा मधाचा उपयोग केला जातो. तसे पाहता सर्व हंगामांत किंवा ऋतूंत मध घेतला तरी चालतो कारण मधामुळे आपल्याला उर्जा मिळते. उत्साह टिकून राहतो. मध प्राशन केल्याने शरीर सुंदर, डौलदार होते. वजन नियंत्रणात राहते. वजन कमी असेल तर वजन वाढवण्यासाठी सुध्दा मधाचा उपयोग केला जातो. अस्थमा, उच्च रक्तदाबासाठी मध गुणकारी असून रक्त शुध्दीकरताही मध उपयुक्त ठरतो. हृदयरोगावरही मध महत्वाची कामगिरी करतो. म्हणूनच अगदी मनापासून आपण मधाचे सेवन करून दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्याकरीता प्रयत्न करूयात. निरोगी राहण्यासाठी मधाचा उपयोग किती हितकारक आहे, हे आपण 'गुणकारी मध' या पुस्तकातून जाणून घेऊ यात. हे पुस्तक निश्चितच सर्वांची आरोग्य संपन्नता वाढवेल, असा मला विश्वास वाटतो. किमान काही गोष्टी तरी आरोग्यासंबंधीच्या वाचकांना माहित होतील; आणि आपले रोजचे दैनंदिन आयुष्य सुखा समाधानात जाईल.
लेखक: सीमा शिंदे
संदर्भ क्रमांक: ४०४८
